राममंदिराच्या जागेवरील वाद मिटल्यानंतर आता मंदिर बांधण्याआधीच या प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. २ कोटींना विकलेली जागा पुन्हा दहा मिनिटांनी १८.५ कोटींना विकल्याने राम मंदिर बांधण्यासाठी आलेल्या निधीत भ्रष्टाचार असल्याचा आरोप होतो. यावरून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे.
राजकीय पक्षांनी आणि राम मंदिर ट्रस्टच्या काही लोकांनी रामाचा उपयोग स्वतःच्या हितासाठी केल्याचा आरोप त्यांनी केलाय.
राम मंदिराच्या नावावर कोट्यवधी रुपये जमा केलेत. आस्थेच्या नावाने असे प्रकार केले जात असतील तर ते दुर्भाग्यपूर्ण असल्याची टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. राम मंदिरासाठी कोणी किती निधी दिला, याची माहिती आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि देशाच्या पंतप्रधानांनी दिली पाहिजे, अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.