'तुम्हाला बघून घेईन,' ही धमकी ठरू शकते; पण तुम्हाला कोर्टात बघून घेईन, ही धमकी ठरत नाही आणि तो गुन्हाही ठरत नाही. एका प्रकरणाच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तसा निर्वाळा दिला आहे.
सुमारे 11 यवतमाळ जिल्ह्यातील रजनीकांत बोरले यांचा पुरवठा अधिकारी शालिग्राम भराडे यांच्याशी कोणत्या तरी कारणाने वाद झाला होता. शब्दाने शब्द वाढत गेला आणि रागाच्या भरात बोरले यांनी भराडे यांना, 'तुम्हाला कोर्टात बघून घेईन,' असे सांगितले. त्यावरून बोरले यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तुम्हाला कोर्टात बघून घेईन, असे एखाद्याला सांगणे हा गुन्हा होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्यावर नोंदवलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका रजनिकांत बोरले यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केली. मात्र जिल्हा न्यायालयात ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे बोरले यांनी नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी बोरले यांच्याविरुद्धचा गुन्हा आणि खटला रद्द करण्याचे आदेश दिले. तुला कोर्टात बघून घेईन, असे म्हणत कोर्टात जाणे हे भारतीय दंडविधान कायद्यानुसार धमकी ठरू शकत नाही, तसेच तो दिवाणी किंवा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा ठरू शकत नसल्याचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी स्पष्ट केले.