प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला व्रत केले जाते. वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहेत. परंतु आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला विशेष महत्त्व आहे. ही एकादशी देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी, हरिशयनी एकादशी, पद्मनाभ एकादशी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.
महाराष्ट्रात ही एकादशी आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते आणि हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी आषाढी एकादशी 10 जुलै 2022 रोजी साजरी होत आहे. असे मानले जाते की आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिने योगनिद्रात जातात आणि याचबरोबर चातुर्मास सुरू होतो.
चातुर्मासची सुरुवात...शुभ कार्य बंद
आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होताच चार महिन्यांसाठी सर्व शुभ कार्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या दिवशी विधिपूर्वक श्रीहरीची पूजा केली जाते. महाराष्ट्रात विठ्ठल-रुक्मिणीची विशेष पूजा केली जाते.
अशी करा पुजा
आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान आटोपल्यानंतर उपवासाचे व्रत करावे. यानंतर पूजास्थान स्वच्छ करून आसनावर भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा, त्यानंतर पिवळे चंदन, पिवळे वस्त्र, हंगामी फळे आणि मिठाई अर्पण करा. धूप-दीप लावावा. 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करा, विष्णु सहस्रनामाचा पाठ करा आणि आषाढी एकादशीची व्रत कथा वाचा किंवा ऐका. शेवटी भगवान विष्णूची आरती करावी.
आषाढी एकादशीचे महत्व
आषाढी एकादशीला टाळ, मृदुंगाच्या आवाजात लाखो वारकीर पंढरपूरकडे जाता. वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन संत ज्ञानेश्वर आणि तुकोबांच्या अभंगाच्या तालावर पावले टाकत लाखो वारकरी खांद्यावर पालखी घेऊन चालत असतात.
पंढरपूरला पोहचल्यावर चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेण्याला खूप महत्त्व असते. जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करुन घरीच मनोभावे विठ्ठलाची पूजा करतो.