भिवंडी शहरातील महसूल विभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे 67 व्यापारी गाळे उभारले आहेत. यावर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन केली आहे.
महसूल विभागाच्या नावे असलेली शहरातील मौजे कामतघर सर्व्हे क्रमांक 42/अ/3 ही 60 गुंठे जागा सदर सोसायटीस शेतकऱ्यांच्या विकासासाठी देण्यात आली होती.त्या जागेवर भात गिरणी, गोदाम सोसायटीचे कार्यालय होते.त्याचा फायदा पंचक्रोशीतील शेकडो शेतकऱ्यांना होत होता.सोसायटीचे सभापती कमलाकर टावरे यांनी येथील भात गिरणी पंधरा वर्षांपासून बंद करून त्या जागेचा वाणिज्य वापर सुरू केला होता.दरम्यान पालिकेने रास्ता रुंदीकरण करीत तेथे सिमेंट कॉक्रीटचा रस्ता बनविला असता रस्ता रुंदीकरणात येथील गाळे बाधित झाल्याचा फायदा घेत मालमत्ता क्रमांक 171,172,173 व 185 या जागेवर तळ अधिक एक मजली वाणिज्य इमारत उभारून तब्बल 67 गाळे उभे केले असून ते 20 हजार रुपये प्रति चौ फुटाने विक्री करून 50 ते 60 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी केला आहे.
या बांधकामामुळे सदरील रस्त्यावर रस्ता रुंदीकरणानंतर ही सततची वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत असून पालिकेने शास्ती प्रमाणे कर आकारणी करून मालमत्ता क्रमांक 185 वरील अनधिकृत गाळ्यांवर कर आकारणी केली असून त्यामध्ये ही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून ही कर आकारणी तात्काळ रद्द करावी व सर्व अनधिकृत बांधकामांवर पालिकेने त्वरित कारवाई करावी अन्यथा उच्च न्यायालयात या विरोधात दाद मागितली जाईल असा इशारा सिद्धेश्वर कामूर्ती यांनी दिला आहे.