केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या स्पष्टोक्तेपणा राजकारणात सर्वानाच सर्वश्रुत आहे. ते त्यांच्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. कुठलीही तमा न बाळगता ते बेधडक बोलतात. आज बुटीबोरी उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यातही त्यांचा स्पष्टवक्तेपणा पाहायला मिळाला.
नितीन गडकरी यांच्या हस्ते बुटीबोरी उड्डाणपुलाचं लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त बोलताना, मी काय डीपार्टमेंटची चिंता करत नाही, काम खराब झालं तर मी पब्लिकली सांगण्याचं काम करतो. कारण मी जनतेचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे मी खराब कामाचा बचाव करत नसल्याचे विधान नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर- हैदराबाद महामार्गावर बुटीबोरी एमआयडीसी जंक्शनजवळ १.६९ किलोमीटर लांब आणि ७० कोटी किंमतीचे उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. नागपूर ते बुटीबोरी मेट्रो रेल्वेच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येईल. शिवाय येत्या सहा महिन्यात नागपूर ते बुटीबोरी महामार्ग सहा पदरी करण्यात येईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
बुटीबोरी येथे पंचतारांकित एमआयडीसी आहे. या शहराचा सुनियोजित विकास झाला पाहिजे. प्रदूषण कमी झाले पाहिजे. स्टेडियम, फूड मॉल येथे होणे आवश्यक आहे. त्यासाठी बुटीबोरी नगर परिषद आपण दत्तक घेणार आहोत. आतापर्यंत जी गावे दत्तक घेतली, त्यांचा चेहरा मोहरा बदलला आहे, असा दावाही त्यांनी केला.