अमोल धर्माधिकारी | पुणे : विद्येच्या माहेरघरात भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्यासाठी एका तरुणाची मांत्रिक महिलेने पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. तसेच, दीड लाखांचा गंडाही त्या तरुणाला घातला आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
माहितीनुसार, पुण्यातील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असलेल्या महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पोलीस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला आहे. स्पर्धा परीक्षेतील यशासाठी नैराश्य घालवू, अशा भूलथापा मारत मांत्रिक महिलेने जादूटोणा करत स्वतःचे पाय धुत ते पाणी पिण्यास युवकाला भाग पाडले. या युवकाची तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये तरुणाने फिर्याद नोंदवली आहे. यानुसार वृषाली संतोष ढोले-शिरसाठ या मांत्रिक महिलेसह साथीदार माया गजभिये आणि सतीश वर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या तिघांविरोधात जादूटोणा विरोधी कायदा कलम 3(2) आणि भारतीय दंडविधान संहिता कलम 420, 506(2) ,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.