प्रमोद लांडे (मंचर, पुणे ): गेली अनेक वर्षे बंद असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्या आहेत, बंदच्या काळात अनेक बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता तेच दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे थापलिंगच्या यात्रेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे त्यामुळे बैलगाडा मालकांसाठी ही आनंदाचीच बातमी मानली जात आहे.
गेले अनेक वर्षे संघर्ष करत बैलगाडा मालकांनी न्यायालयीन लढाई जिंकली असली तरी बंदच्या काळात अनेक बैलगाडा मालकांवर स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले गेले आहे. मात्र यावेळी वळसे पाटील यांच्यावर थेट गृहमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. यावेळी तरी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे अशी विनंती थापलिंगच्या यात्रेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम यांनी केली. त्यानुसार वळसे पाटील यांनी बोलताना बैलगाडा मालकांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या असल्याचे सांगितले आहे.
गुन्हे मागे घेण्याची काय आहे प्रक्रिया ?
बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. तर ज्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत त्या पोलिस स्टेशमधून पोलिस अधीक्षकांना प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे, त्यानंतर संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करावा लागणार आहे, त्यानंतर गृहमंत्र्यांकडे हा प्रस्ताव जाईल, गृहमंत्री त्याला मान्यता देतील, तो पुढे न्यायालयात दाखल करून मग गुन्हे मागे घेतले जातील. अशा प्रकारची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना सांगितले.