मुंबई : मुंबईसह उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे ठिकठिकाणी सखोल भागात पाणी साचले होते. तर, लोकल पूर्णपणे विस्कळीत झाल्या होत्या. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अशातच, काही शाळांनी मुलांना दुपारीच घरी सोडले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळांनाही सुट्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.
गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रात्रभर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केली. मुंबई, ठाणे,पालघर आणि रायगडमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
तर, लोकल उशिराने धावत असल्याने सर्व रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकाच्या बाहेर एसटी आणि बसेस सोडण्याचे एकनाथ शिंदेंनी आदेश दिले आहेत. सीएमएसटी, भायखळा दादार, घाटकोपर ठाणे स्थानकाच्या बाहेरून एसटी व बसेस सोडण्यात येणार आहे. तर, चर्चगेट, मुंबई सेट्र्ल, दादर, वांद्रे, अंधेरी व बोरीवली स्टेशनच्या बाहेर एसटी व बसेसची सोय करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुढील तीन दिवस मुंबईतील जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा वगळता विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यात आज आणि उद्या अतिमुसळधार पाऊस कायम राहणार आहे. तर, आज पुणे, रायगड, पालघर, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.