मुंबई : मुंबईसह उपनगरांत पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अशात, मुंबईसह उपनगरांना उद्याही अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे पावसाचा जोर कायम राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजेच शुक्रवारी रत्नागिरी, वसई-विरार, पालघर, ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत कालपासूनचं पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिरात जोरदार पाऊस सुरु आहे. याशिवाय कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातही पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट दिला असून रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भ आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे. आणि वायव्य दिशेला त्याची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून आल्या आहेत. कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.