शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांच्यावर सिटी सहकारी बँकेत घोटळा केल्याचा आरोप झाला होता. भाजपा आमदार रवी राणांनी या विरोधात ईडीकडे तक्रार केली होती. या प्रकरणी ईडीने अडसूळ आणि त्यांच्या मुलाला चौकशी साठी बोलावले होते.
अडसूळांनी या समन्सविरोधात गुरुवारी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका अमान्य केली आहे. त्यांचे वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बडनेराचे आमदार रवि राणा यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आमदार रवि राणा यांनी सिटी बँकेत ९८० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केली. यानंतर ईडीने या दोघांना समन्स पाठवले होते. त्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहचले होते.
ईडीने बजावलेल्या समन्सविरोधात माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच कठोर कारवाईपासून तातडीचा दिलासा देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणीत तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला होता. तसेच अडसूळ यांचे वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले होते. या सुनावणीत तर न्यायालयाने त्यांची याचिकाच फेटाळली.