राज्यात पुढील २८ तासांसाठी हवामान खात्याने मुसळधार पाऊसाचा इशारा दिला आहे. यदा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांचे नुकसान झाले. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी पडतील असे सांगण्यात आले आहे.
सध्या मान्सूनचा असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. दक्षिण-पूर्व झारखंड व परिसरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. तर पुढील २८ तासांमध्ये त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पूर्व राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून पुढील तीन दिवस अशीच कायम राहणार आहे. आज संपूर्ण कोकणासाठी यलो अलर्ट जारी, 64 मिमी ते 115 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या चारही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात विजांसह मुसळधारेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, नाशिक, साताऱ्यातील घाट माथ्यावर चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. देशाच्या पूर्व व मध्य भागात आजपा-सून पावसाचे प्रमाण वाढणार आहे.