कोल्हापूर | सतेज औंधकर : कोल्हापूरला आजही ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे. त्यातच गेल्या चोवीस तासात पासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पंचगंगा नदी पात्र बाहेर गेली आहे. सध्या पंचगंगेची पाणीपातळीही 30 फूट 6 इंच आवर पोहोचली असून तासागणिक पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पंचगंगा कुंभी कासारी दूधगंगा वेदगंगा हिरण्यकेशी सह सर्वच नद्या नद्या दुथडी भरून वाहत असून 26 बंधारे पाण्याखाली गेल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा कडे झाली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 13 प्रकल्प शंभर टक्के भरले असून या सर्वच प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. 24 तासात गगनबावडा राधानगरी शाहूवाडी परिसरातील धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली असून राधानगरी सह धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे अद्यापही उघडेच असून सात हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग या नदीपात्रातून होत आहे दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.