नागपूरमध्ये विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. सकाळपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचून रस्त्यालगतच्या घरांमध्ये तसेच दुकानमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळत असून जोरदार पावसामुळे शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत. शाळांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, कुही परिसरात काही रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. नागपूर विभागात सुद्धा गडचिरोलीतील काही भागांचा संपर्क तुटला आहे. विभागीय आयुक्त सातत्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. त्यांनाही सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.