जूनमध्ये मान्सूनचे आगमन झाले होते. परंतु त्या तुलनेत राज्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे काही जिल्ह्यांवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते. मात्र, मागील आठवड्यापासून राज्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. हवामान विभागाने आगामी चार दिवस पुन्हा नाशिक, पुणे, पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर केला आहे. राज्यात १ जूनपासून ते ११ जुलैपर्यंत ३२१.० मिलिमीटर सरासरी पावसाची शक्यता असते, मात्र सलग चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सरासरीपेक्षा ३८०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून म्हणजे सरासरीच्या १९ टक्के अधिक पडला आहे.
घाटमाथ्यावर धुवांधार पावसाला अनुकूल वातावरण असल्याने पुणे, नाशिक, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे धरणसाठ्यामध्ये वाढ झाली असून नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने दारणा व गोदावरी नदीला पूर आला आहे. नाशिकमध्ये रविवारी सोमवारी सकाळपर्यंत ७७ मिलिमीटर तर सोमवारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच विदर्भात नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, पुणे, मालेगाव, माथेरान, कोल्हापूर या शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र, नाशिक जिल्ह्यात उगम पावणाऱ्या नार, पार, दमणगंगा या नद्यांना पूर आला होता.
का होत आहे पाऊस
मागील आठवड्यात मध्य प्रदेश, ओडिसाच्या परिसरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि गुजरात ते कर्नाटकच्या किनारपट्टीवर सुमारे एक हजार किलोमीटर लांब अंतरावर टर्फ निर्माण झाल्याने घाटमाथ्यासह इतर ठिकाणी धुवाधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे.