आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. आरोग्य विभागात दलाल घुसल्यामुळेच परीक्षा रद्द झाल्याचा संशय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
आदल्या रात्री विद्यार्थ्यांना समजतं परीक्षा रद्द झाली, या सरकारचा घोळ काही समजत नाही. प्रवेश पत्र यूपीमधलं मिळतं. सगळंच कन्फ्युजन आहे, काही दलाल मार्केटमध्ये आलेले आहेत, या पदांसाठी त्यांच्यापासून 5 लाख, 10 लाख गोळा करण्याचे प्रकार घडत आहेत, हे गंभीर आहे, या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावं, विद्यार्थ्यांचं नुकसान बंद करा, अन्यथा आंदोलन करु, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
या प्रकरणाची 100 टक्के चौकशी व्हावी, हे दलाल कोण आहेत ते समोर आलं पाहिजेत. विद्यार्थ्यांकडे पैसे मागितले जात आहेत त्याची चौकशी व्हावी. परीक्षा रद्द होण्यासाठी कोणीही घोळ केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे, सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, सर्वत्र घोळच घोळ सुरु आहे, या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का? हा दलालीचा नवा अध्याय सुरु होईल, परीक्षेतील घोळ आहे की सरकारचा घोळ आहे? याची चौकशी करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.