आदेश वाकळे | शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाच्या शुभारंभ जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिध्दाराम सालीमठ यांनी प्रथम अध्याय, विष्णु थोरात, प्र.अधिक्षक यांनी व्दितीय अध्याय, प्रज्ञा महांडुळे, प्रशासकीय अधिकारी यांनी तृतीय अध्याय, चंद्रकांत डांगे, अधिक्षक यांनी चौथा अध्याय व विठ्ठल बर्गे, अधिक्षक यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला. उत्सवाचे निमित्ताने जिल्हाधिकारी तथा सदस्य तदर्थ समिती सिध्दाराम सालीमठ यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी संस्थानचे मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके हे उपस्थित होते.