गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी काही मराठा आरक्षण संघटनांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील घराबाहेर उपोषण केलं होतं. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे.
याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सदावर्ते म्हणाले की, मनोज जरांगेंना तातडीने अटक करा. जरांगेंचे लाड थांबवले नाहीतर मी पण उपोषण करणार. हल्ला झाला तरी मी माझा लढा सुरुच ठेवणार. सरकारने एकट्या मनोज जरांगेंचं ऐकू नये. हेच जरांगे पाटलांच्या शांततेचे आंदोलन आहे का? माझी मुलगी झेनला मारण्याच्या आणि जयश्री पाटलांना उचलून नेण्याच्या धमक्या दिल्या जातायत. जरंगे पाटील यांना माझा प्रश्न आहे हीच आहे का तुमच्या शांततेच्या आंदोलनाची भाषा.
७ वाजता माझी मुलगी शाळेत जाते. त्याचवेळी हल्ला कसा काय होतो? हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना भेटणार. 20 पोलीस असताना घरात घुसण्याच्या प्रयत्न करण्यात आला. माझ्या घराची रेकी करण्यात आली. पोलिसांना माहिती होत की माझ्यावर हल्ला होणार आहे.पोलिसांनी स्वतः मला सांगितलं होत माझ्या घरापर्यंत घुसण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मी अगदी शेवटपर्यंत लढत राहीन.असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.