एनसीबीचे विभागीय संचलाक समीर वानखेडे यांच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने नवाब मलिक यांना वानखेडे कुटुंबियांविरोधात ९ डिसेंबरपर्यंत कोणतंही वक्तव्य करण्यास मज्जाव केला आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी एकसदस्यीय खंडपीठाच्या निर्णयाविरोधात मुंबईत हायकोर्टात अपील केली होती. मानहानीच्या दाव्यात खंडपीठाने नवाब मलिकांविरोधात अंतरीम आदेश देण्यास नकार दिला होता.
खंडपीठाने ज्ञानदेव वानखेडे यांची मागणी फेटाळली होती ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात कोणतंही वक्तव्य करण्यास किंवा सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्रकाशित करण्यास नवाब मलिक यांना मनाई करावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने नवाब मलिक यांना बोलण्याचा अधिकार (right to freedom of speech and expression) असल्याचं सांगत मागणी फेटाळली आहे. यानंतर ज्ञानदेव वानखेडे यांनी निर्णयाला आव्हान दिलं होतं.