विकास माने| बीड
बीड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील (government hospital) समस्या वाढतच आहे. खाटा नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपवावे लागत आहे. त्यात गरोदर महिलाही आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या शेजारीच असलेल्या बीड जिल्ह्यातील हे विदारक वास्तव आहे.
राज्यातील अनेक शासकीर रुग्णालयाची परिस्थिती गंभीर आहे. यामुळे अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कोरोना काळात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले असले तरी त्यानंतर अनेकादा रुग्णालयांमध्ये आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रकार काही महिन्यांपुर्वी नाशिक, नगर आणि मुंबईत घडले. आता शासकीय रुग्णालयातील आणखी एक गोंधळ समोर आला. बीड जिल्हातील आष्टी तालुक्यातील कडा आरोग्य केंद्रात खाट नसल्याने महिला रुग्णांना अक्षरशः जमिनीवर झोपावे लागत आहे. एक दोन नाही तर तब्बल 200 महिलांना जमिनीवर झोपण्याची दुर्दैवी वेळ आलीयं. ही परिस्थिती गेल्या महिनाभरापासून जैसे थेच आहे. यातील अनेक महिला गरोदर असून काही कुटुंबकल्याणचे रुग्ण आहेत.