भारत गोरेगावकर, रायगड | श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुवर्ण गणेशमूर्तीची पुनःप्रतिष्ठापना २३ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पूजा करून या मुखवटयाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे दिवेआगर परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
दिवेआगर येथील गणपतीची सोन्याची मूर्ती 23 मार्च 2012 रोजी चोरीला गेली होती.दरोडेखोरांनी दोघा सुरक्षा रक्षकांचा खून करून हा सुवर्ण गणेशाचा मुखवटा व दागिने मिळून 1 किलो 600 ग्राम सोने पळवून नेले होते. पोलीसांनी ते सोने लगडीच्या स्वरूपात हस्तगत केले होते. मात्र या गणपतीशी दिवेआगर वासीयांच्या भावना आणि एक वेगळ्या प्रकारचे नाते तयार झालं आहे. सर्व न्यायालयीन व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याच सोन्यापासून गणेश मुखवटा पुन्हा तयार करण्यास परवानगी मिळाली. सुप्रसिदध सुवर्णकार पु. ना. गाडगीळ यांनी हा नवीन मुखवटा तयार केला आहे. नव्याने गणेश मुखवटा स्थापित होणार असल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दिवेआगरमध्ये पुन्हा एकदा सुवर्ण गणेश स्थापन होणार असल्याने स्थानीक व्यावसायिक आनंदित आहेत. उद्या 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता मंदिरात ब्रह्म आवर्तने सुरू होतील त्यानंतर दुपारी 12 वाजता अजित पवार सपत्नीक सुवर्ण गणेश प्रतिस्थापना करण्यात येईल. पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यावेळी उपस्थित असतील.