संतोष आवारे | संपूर्ण देशासह महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार प्रकरणाला आज 13 जुलै 2021 रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेला पाच वर्ष लोटून सुद्धा अद्याप या प्रकरणात पिडीतेला न्याय मिळाला नाही आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे.
13 जुलै 2016 च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रासह देशभरात या घटनेचा निषेध करण्यात आला.
दरम्यान कोपर्डी खटल्यात जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या तिन्ही आरोपींना कट रचून मुलीवर अत्याचार करणे, खून करणे, तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार 18 नोव्हेंबर 2017 रोजी दोषी ठरवत, 29 नोव्हेंबरला फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेलं. या खटल्यातील दोषी नितीन गोपीनाथ भैलूमने औरंगाबाद खंडपीठापुढील हा खटला मुंबईत वर्ग करण्याची विनंती केली होती. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी ही विनंती मान्य करत हा खटला मुंबई उच्च न्यायालयात वर्ग केला. दरम्यान या घटनेत अजूनही न्याय मिळाला नाही आहे.
आज या घटनेला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित कोपर्डी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन निर्भयाला श्रद्धांजली अर्पण केली. या घटनेला आज पाच वर्ष झाली आहे मात्र अजूनही या घटनेतील नराधमांना कोणतीही शिक्षा झालेली नाही यामुळे या प्रकरणात मृत्यू पावलेली पीडिता व तिचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत़.
"माझ्या छकुलीला न्याय मिळालेला नाही या पूर्वीचे राज्यातील सरकार व विद्यमान सरकार हे सर्व जण आम्हाला न्याय मिळेल असे केवळ आश्वासन देतायत", त्यामुळे आमची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना विनंती आहे की आपण स्वतः लक्ष घालून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. त्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली.