गणपतीची सुरुवात होते ती हरतालिकेच्या व्रतापासून सुरू होतो. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरतालिकेचं व्रत महिला करत असतात. उत्तरेकडील राज्यांमध्ये याला तीज असंही म्हणतात. विदर्भाच्या अतिपूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये या सणाला "गौरीपूजन" या नावाने ओळखले जाते.भंडारा जिल्ह्यात व परिसरातील जिल्ह्यांमध्ये या सणाला गहू पेरून त्यांची पूजा केली जाते.महिला घरातील गोवर्यांचा चुरा करतात. हा चुरा बाजारातून बुरड समाजाकडून विकत घेऊन आणलेल्या बांबूच्या टोपल्यांमध्ये घालून ओला करून यावर भिजवलेले गहू पेरतात. गहू पेरलेल्या या टोपल्यांना अंधार असलेल्या खोलीत झाकून ठेवले जाते. काही दिवसातच या गव्हाची लहान लहान अंकुर निघायला सुरुवात होते व ते हळू हळू मोठे होते. अंधारात जपून ठेवल्यामुळे त्या पेरलेल्या गव्हाचा रंग पिवळसर असतो. हे उगवलेले गहू "गौर" या नावाने संबोधले जातात.
का करतात हे व्रत
हे व्रत भगवान शंकराला आणि माता पार्वतीला समर्पित आहे. पौराणिक मान्यतेनुसार कुमारी कन्या हे व्रत चांगला मनासारखा पती मिळण्यासाठी करतात. तर लग्न झालेल्या महिला हे आपलं सौभाग्य अबाधित राहावं, यासाठी हरतालिकेचं व्रत करत असतात. हे व्रत करूनच माता पार्वतीनं आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकराची प्राप्ती केली होती, अशी महिलांची धारणा आहे.