पुणे : कोरोनाच्या सावटानंतर दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे. परंतु, पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत वाद निर्माण झाला असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.
राज्यातील अभूतपूर्व राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला आहे. आज अखेरच्या दिवशी राजकीय वाद बाजूला सारुन विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजप नेते चंद्रकात पाटील, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील विसर्जन मिरवणुकीस उपस्थिती लावली आहे. परंतु, यावेळी पुण्यात पवार, पाटलांचे कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे. शनिपाराजवळ पवार व पाटलांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
तर, दुसरीकडे कसबा गणपतीची आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी आदित्य ठाकरे आणि चंद्रकात पाटील यांनी पालखीला एकत्रित खांदा दिला. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.