कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये. यासाठी ठाणे महापालिकेच्या डिजीठाणे (DigiThane)द्वारे यावर्षीही ''ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा'' राबविण्यात येत आहे. ०१ सप्टेंबर, २०२१ पासून सुरु करण्यात येईल, असे महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (DR. Vipin Sharma) यांनी सांगितले.
यावर्षीही शहरातील सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव शांततेत व सुरक्षित पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिका यंत्रणा विविध उपाययोजना करीत आहेत. त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा यावर्षीही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
www.ganeshvisarjan.covidthane.org या लिंकवर जाऊन आपल्या प्रभागातील कृत्रीम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी बघून गणेश मूर्ती विसर्जनासाठी आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचे टाइमस्लॉट (time slot) बुक करावे. नागरिकांनी बुकिंग झाल्यानंतर एसएमएसद्वारे (MMS)आलेली क्यूआर कोड (QR Code)पावती डाऊनलोड करून ठेवावी.