गडचिरोली : छत्तीसगड आणि महाराष्ट्र पोलिसांनी मिळून जिच्यावर ११ लाखांचे ईनाम ठेवले होते, त्या रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी या २८ वर्षीय महिला नक्षलीने आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शांततेचे प्रतिक असलेला पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत केले.
रजनी ही छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. २००९ मध्ये नक्षल चळवळीत दाखल झालेल्या रजनीचा अनेक हिंसक नक्षली कारवायांमध्ये सहभाग होता. तिच्यावर महाराष्ट्र शासनाने ६ लाख तर छत्तीसगड शासनाने ५ लाख रुपयांचे ईनाम ठेवले होते. नक्षल चळवळीत राहून भ्रमनिरास झाल्यामुळे रजनीने आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उर्वरित नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण करावे, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पोलिस दलाकडून सहकार्य केले जाईल, असे आवाहनही यावेळी नीलोत्पल यांनी केले.