महेंद्र वानखडे | भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.शहरात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आता अशी चर्चा मिरा भाईंदर शहरातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मीरा भाईंदर शहरातील जिल्हाअध्यक्ष पदी निवडी दरम्यान भाजपचे दोन गट पडल्याची घटना समोर आली होती. यामध्ये रवी व्यास यांचा गट व नरेंद्र मेहता यांचा गट समोरासमोर आला होता.दरम्यान जिल्हाअध्यक्ष पदी रवी व्यास यांची निवड झाल्याने मेहता गट नाराज झाला होता. ही नाराजी मेहता गटातील महापौर-उपमहापौर आणि 45 पेक्षा अधिक नगरसेवक यांनी प्रदेश कार्यालयात जाऊन पक्षश्रेष्ठींसमोर बोलून दाखवली. यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर पुढे आम्ही वेगळा निर्णय घेऊ असा इशाराही दिला होता.
दरम्यान आता पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मेहता यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासुन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मेहता यांच्या भेटीगाठी वाढल्यामुळे नरेंद्र मेहता शिवसेनेत जाऊ शकतात अशी चर्चा शहरात सुरू आहे.
नरेंद्र मेहता यांनी केले आरोपाचे खंडन
पक्षातील निर्णयावर नाराज मात्र पक्ष श्रेष्ठींवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. मी या शहरातचा महापौर, आमदार होतो. त्यामुळे सर्वपक्षाशी माझे संबंध चांगलेच असल्याचे सांगत नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चांवर पूर्णविराम दिला.