मागील काही दिवसात हॅलो आणि वंदे मातरम वरून राज्याच्या राजकारणात मोठे घमासान पाहायला मिळाले. त्यानंतर आज राज्यातील वन विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी कार्यालयाशी संबंधित फोनवर बोलताना 'हॅलो' ऐवजी आता 'वंदे मातरम' या शब्दाचा वापर करावा असं आवाहन राज्याच्या वन मंत्रालयाने केलं आहे. वंदे मातरम म्हणावं की नाही ऐच्छिक असणार आहे. असे या परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्याच्या महसूल आणि वन विभागाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर याविषया संबंधी पहिलीच घोषणा केली होती.
काय आहे परिपत्रकामध्ये ?
वनविभागातील अधिकारी 'हॅलो' ऐवजी आता 'वंदे मातरम' म्हणावं असे परीपत्रक जारी करण्यात आले आहे. वन विभाग आणि महसूल विभागासाठी हे परिपत्रक आहे. त्यात अस आहे की, "वनविभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी शासकीय कामानिमित्त जनता किंवा लोकप्रतिनिधी यांच्याशी दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संवादादरम्यान अभिवादन करताना हॅलो ऐवजी वंदे मातरम या शब्दाचा वापर करावा असं आवाहन करण्यात येत आहे. "महसूल आणि वन विभागाने काढलेले परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाचा संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलं आहे.
रझा अकादमीने केला होता विरोध ?
राज्यात प्रचंड राजकीय गोंधळ सध्या सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बोलताना सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी फोन संभाषणाची सुरुवात हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्'नं करण्याचं अभियान राबवणार, असे ते म्हणाले होते. मंत्री मुनगंटीवार यांनी पहिल्याच दिवशी मोठी घोषणा केली यामुळे प्रचंड घमासान राजकारणात निर्माण झाली. अनेक राजकिय लोकांनी यावर टीका करण्यास सुरवात केली. मात्र, या आदेशामुळे वाद वाढतच गेला. रझा अकादमीनं या आदेशाला विरोध दर्शवला आहे. आमच्याकडे फक्त अल्लाहची पूजा केली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांना जो शब्द मान्य असेल असा शब्द द्यावा, अशी मागणी रझा अकादमीने करत या निर्णयाला विरोध केला होता.