सतेज औधकर, कोल्हापुर | कोल्हापुरात पुररेषा आखण्यामध्ये गोंधळ झाला. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने काहीही विचार करता, विज्ञानाचा आधार न घेता पुररेषा मंजूर केल्याची टीका पर्यावरण अभ्यासक, चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली. तसेच आता पुन्हा नव्याने पूररेषा आखण्याची गरज असल्याचेही त्यांनी मत मांडले. कोल्हापूरात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
कोल्हापूरात आलेले महापूराचं संकट निसर्ग निमित्त संकट नाही तर मानव निर्मित, शासन निर्मित संकट होते, असे मेधा पाटकर म्हणाल्या. पुररेषा आखण्यामध्ये जो गोंधळ झालाय, फडणवीस सरकारने काहीही विचार करता, विज्ञानाचा आधार न घेता मंजूर केली. आता तत्काळ पुन्हा पुररेषेची आखणी झाली पाहिजे.
तसेच लोकांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, त्यांचा यामध्ये काहीच दोष नाही, त्यांना केवळ अनुदान नव्हे तर पंचनाम्याच्या आधारावर शेतीचे असो, घराचे असो, दुकानाचे असो ते तत्काळ मिळालं पाहिजे असेही मेधा पाटकर यावेळी म्हणाल्या.
रायगड प्रमाणे कोल्हापूरात अनेक प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट झाले आहेत, ज्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. रस्त्यांची उंची वाढवली आहे, महामार्ग बांधलेत त्याच्या खालून जो भराव घातला आहे. तेथून पाण्याला जायला वाटही ठेवली नसल्याचेही त्यांनी सांगितले.