कमलाकर बिरादार | नांदेड : नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पाच किडनी विकणे आहे, अशा आशयाचे एक पोस्टर लावण्यात आले आहे. चक्क किडनी विकण्याची जाहिरात आणि त्यावर मोबाईल क्रमांक देखील दिला आहे. या पोस्टरबाबत नांदेडामध्ये एकच चर्चा सुरू झाली.
या पोस्टरवरील क्रमांकावर संपर्क केला असता सत्यभामा चुनचूनवाड नामक महिलेने आपण ते पोस्टर लावल्याचे सांगितले. सावकारी कर्ज फेडण्यासाठी आपण किडनी विकण्याचे पोस्टर लावल्याचे त्यांनी सांगितले. सत्यभामा चूनचूनवाड ह्या नांदेड जिल्हयातील मुदखेड तालुक्यातील वाई या गावातील रहिवाशी आहेत. लॉकडाऊनपूर्वी पतीच्या उपचारासाठी त्यांनी दोन लाख रूपये मुदखेड सावकाराकडून व्याजाने घेतले होते. पण नंतर त्यांना परतफेड करता आली नाही.
पैश्यांसाठी तगादा लावला होता, त्याच भीतीने त्यांनी कुटुंबासह गाव सोडलं. सध्या त्या मुंबईत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन वर्षांपासून त्यांच्या गावाकडील घराला कुलूप आहे. दोन वर्षांपासून त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा गावातील कोणाशीही संपर्क झालेला नाही. परंतु, किडनी विकणे लावलेल्या पोस्टर ने मात्र नांदेड खळबळ उडाली आहे.