चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटक जंगल सफारीचा आनंद लुटत असताना तारू आणि शंभू नामक दोन वाघ त्यांच्या समोर आले. डरकाळी फोडत दोन्ही वाघ आपापसात भिडले. हा थरार बघून पर्यटकांनी फोटो आणि व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. हा थरार सुमारे अर्धा तास सुरु होता. यामध्ये दोन्ही वाघ जखमी झाले आहेत.
हे दुर्मिळ दृश्य मुंबईचे वन्यजीव छायाचित्रकार नितीन उळे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. उळे म्हणाले, 'तेव्हा दुपारची वेळ होती. जंगल सफारीला निघाल्यावर अचानक तारू आणि शंभू हे दोन्ही वाघ समोर आले. काही वेळातच एक एक जिप्सी तिथे जमा होऊ लागली आणि सर्व पर्यटक वाघांचे फोटो काढण्यात मग्न होते. मग अचानक दोन्ही वाघांमध्ये झुंज सुरु झाली. हे फार थरारक होते.
युध्दादरम्यान दोन्ही वाघ एकमेकांच्या खूप जवळ येत होते. ज्यामुळे पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. तिथे जिप्सींची संख्या जास्त असल्यामुळे सर्व जिप्सी एकमेकांच्या मागेच उभ्या होत्या. त्यांना तिथून बाहेर पडणे देखील अशक्य झाले. वाघ अधूनमधून एकमेकांवर हल्ला करत होते. हे दृश्य फार दुर्मिळ होते, असा अनुभव त्यांनी सांगितला.