प्रतिनिधी : अविनाश सोनावणे
युवकाने लिथियम बॅटरीचा वापर करुन भंगारातील साहित्य वापरून बनवली तीन चाकी कार. सद्यस्थितीमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणार्या इंधन दरवाढीने जनसामान्य हैराण झाले आहेत यामुळे दररोज बसणार्या इंधन महागाईच्या चटक्यांमुळे नंदुरबार तालुक्यातील अजेपूर येथील एका २६ वर्षीय युवक अर्जुन चौरे याने चक्क भंगारातील साहित्य वापरुन तीन चाकी कार बनविली आहे. लिथियम बॅटरीचा वापर करुन साकारण्यात आलेली ही कार ताशी सुमारे ४५ कि.मी.वेगाने सुसाट धावते.
१ रूपयात ५० कि.मी. नंदुरबार तालुक्यातील अजेपूर (बंधारपाडा) येथील अर्जुन चौरे या २६ वर्षीय युवकाचे शिक्षण नंदुरबार येथील शासकीय आयटीआय इलेक्ट्रॉनिक झाले आहे.सध्या तो नंदुरबार पालिकेंतर्गत झराळी येथील झराळी पंपींग स्टेशनवर खासगी विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. यातून त्याला मिळणारे मानधन तोकडेच आहे. घरी आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. अर्जुन चौरे याच्याकडे वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. मात्र यात उदरनिर्वाह चालविणे कठीत जाते. त्यातच आता दिवसेंदिवस वाढणार्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाल्याने याचे चटके अर्जुनला देखील सोसावे लागत आहे.
अजेपूरहून नंदुरबारला पाणी पुरवठा करणार्या झराळी प्रकल्पापर्यंत अर्जुन जुन्या दुचाकीने पोहचत होता. मात्र आता इंधन दरवाढ झाल्याने त्याला मिळणार्या मानधनात दुचाकी वापरणे कठीण होते.नंदुरबार जिल्ह्यात सध्या १०४ रूपयांवर पेट्रालचे दर झाले आहेत. यामुळे त्याने पेट्रोलचा खर्च कमी करण्यासाठी काहीतरी नवीन शोधावे यासाठी विचार करत असतांना एक भन्नाट कल्पना सुचली. सध्या बाजारात बॅटरीवर चालणारी स्कुटी विक्रीला आहे. बॅटरीवर चालणार्या कारचे प्रयोग देखील होत आहेत. असे असले तरी भंगारातून विविध साहित्य गोळा करुन लिथियम बॅटरीचा वापर करीत तयार केलेली तीन चाकी कार सध्या परिसरासाठी कुतूहलाचा विषय बनला आहे.
अर्जुन झराळी येथील पंपींग स्टेशनवर कार्यरत असल्याने त्याला वीजेची उर्जा प्रवाहित होवून कोठे आणि कसा परिणाम घडविते याचा अभ्यास होता. त्याच्या ज्ञानाच्या बळावर भंगारातील टाकाऊ चाक, टायर, स्टेअरिंग मिळविले. त्यांचा जुगाड करीत एक चालक व मागे एक जण बसू शकेल अशा आसन व्यवस्थेलाच खालून रॉडचा आधार देत तीन चाकी कार साकारली. यात लिथियम बॅटरीचा वापर करण्यात आला. सदरची कार तासभर चार्जिंग केल्यावर ४५ ते ५० कि.मी.अंतर ताशी ४५ कि.मी.वेगाने धावू शकते.यासाठी युवकाने नंदुरबार येथुन भंगार साहित्याची खरेदी करत तीन चाकी कार तयार केली.यासाठी तयाला ४० हजाराचा खर्च आला.