डी. वाय. पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचे शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला व केंद्रीय कृषी कायदे, शेतकऱ्यांचे आंदोलन यांविषयी मते मांडली. तसेच शेतकरी आंदोलनावर चिंताही व्यक्त केली.
गेल्या सात महिन्यांपासून केंद्रातील कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यापैकी कोणीच माघार घ्यायला तयार नसल्याचे दिसते. यातच भाजप आणि शेतकरी आंदोलक दिल्ली सीमेवर एकमेकांना भिडल्याचे चित्रही पाहायला मिळाले.
पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांची भूमिका तीव्र आहे. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ दहा बैठका झाल्या. त्याचा तोडगाही निघाला नाही. आता सरकार चर्चा करायलाही तयार नाहीत. त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जात आहे.या एकूणच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध होत आहे. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.