शेतकरी संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून आज शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत भारत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. आज शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस आहे. शेतकऱ्यांनी वर्षभराआधी कृषी कायदे रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
गावातील दुकानं आणि ग्रामीण औद्योगिक व सेवा क्षेत्रातील संस्था बंद राहण्याची शक्यता आहे. भाजीपाला आणि इतर पिकांचा पुरवठा आणि खरेदी बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. धान्य बाजार, भाजी मंडई, शासकीय आणि निमसरकारी कार्यालये, ग्रामीण औद्योगिक व सेवा क्षेत्रातील संस्था आणि खाजगी क्षेत्रातील उद्योग बंद ठेवणार असल्याची शक्यता आहे.