भारत गोरेगावकर
रायगडच्या खालापूर तालुक्यातील वावोशी विभागातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. गोठीवली, गोहे, नंदनपाडा परिसरातील शेतकऱ्यांनी 20 वर्षांपूर्वी आपल्या जमिनी न्यू मिलेनियम कंपनीला औद्योगिक वापरासाठी विकल्या होत्या.
कंपनीने तिथं उद्योग उभारला नाही. काहींना चेक बाउन्स झाल्यामुळे आपल्या जमिनीचे पैसेही मिळालेले नाहीत. आता या जमिनी इतरांना विकण्याचा घाट घातलाय तर काहींचे व्यवहारही झाले आहेत. हे सर्व व्यवहार बेकायदेशीर असून यात स्थानिक लोक प्रतिनिधींचे हितसंबंध जपले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
या जमिनींची विक्री परवानगी रद्द करून पुन्हा आपल्या नावे कराव्यात या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. वयोवृद्ध महिलाही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनाची दखल महसूल प्रशासनानेही घेतली असून याबाबत खालापूर तहसील कार्यालयाकडून कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे.