मयुरेश जाधव|अंबरनाथ : बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनीवर एमआयडीसी अतिक्रमण करत आहे. अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात एमआयडीसीने पाईपलाईन टाकण्यासाठी भूसंपादन केले. रस्त्यासाठी दिलेली जागा, पाईपलाईनसाठी दिलेली जागा आणि भूसंपादन यात तफावत असल्याची तक्रार शेतकरी करतात. एमआयडीसीकडे वारंवार पाठपुरावा करुनही एमआयडीसी लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी शासनाने लक्ष वेधण्यासाठी महामार्गावर जाहीर सूचनेचा फलक लावला आहे. एमआयडीसीने खासगी जागेवर अतिक्रमण केले असून 8 दिवसांत याची दखल न घेतल्यास महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्याचा इशारा वसार गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील वसार गावतील वायले कुटुंबियांची जमीन बाधित होत होती. शेतकऱ्यांनी जमीन देखील एमआयडीसीला देऊ केली होती. यासाठी जमिनीच्या मोबदल्याची ऍडव्हान्स रक्कम देखील शेतकऱ्यांना देण्यात आली होती. मात्र जी जमीन भूसंपादनात बाधित होणार होती ती ताब्यात न घेता एमआयडीसीने दुसरीच जमीन ताब्यात घेतल्याने सध्या शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोणत्याही प्रकारचे व्यावसाय सध्या दोन्ही जमिनींनवर करणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. मात्र भूसंपादनात असलेली अन्य जमीन ही शेतकऱ्यांना परत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र याकडे एमआयडीसीचे अधिकारी लक्ष देत नसल्याने शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. गेले २५ वर्ष एमआयडीसी विभागाकडे पाठपुरावा करून देखील कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत नसल्याने भूमिपुत्रांना व्यवसाय करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे एमआयडीसीने अतिक्रमण केलेल्या महामार्गावरील काम करण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. आधी आमच्या जमिनीचा प्रश्न सोडवा नंतर महामार्गावरील खड्डे बुजवा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
१९७२ ला एमआयडीसीने पाईपलाईन टाकण्यासाठी येथे भूसंपादित क्षेत्र केले होते. आमच्या खासगी जागेवर व्यवसाय करण्याचा आम्ही विचार केला तेव्हा आमच्या अशी गोष्ट लक्षात आली की भूसंपादित क्षेत्र वेगळे आहे. त्यामुळे या जागेवर आम्हाला कोणताही व्यवसाय करता येत नाही. एमआयडीसीकडे वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत. आमच्याकडे काही पैशांची देखील मागणी केली जात आहे.