मुंबईचे माजी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2006 च्या लखन भैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय आज (मंगळवारी) निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 8 नोव्हेंबर 2023 रोजी या 2006 मध्ये दाखल केलेल्या 16 अपीलांच्या सुनावणीवर निकाल राखून ठेवला होता.
कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा सहकारी राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैयाच्या बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणात 2013 मध्ये सेशन कोर्टाने 21 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. वसईत राहणाऱ्या लखन भैया विरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी संध्याकाळी लखन भैय्याचे पश्चिम मुंबईतील वर्सोवा येथे एन्काऊंटर झाले होते.
2013 मध्ये मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणात 13 पोलिसांसह 21 जणांना दोषी ठरवले आणि सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर चकमक प्रकरणातील दोषींनी दाखल केलेल्या अपीलांवर सुनावणी झाली.
दरम्यान, अंडरवर्ल्डमधील गुंडांचा कर्दनकाळ अशी ओळख असणारे एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रदीप शर्मा यांची पोलिस दलातील कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे.