पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा संप पुकारून राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐरणीवर आणणाऱ्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पुणतांबा गावातून (Puntamba Village) पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन (Farmers agitation) सुरू झालं आहे. पुणतांब्यात आजपासून पाच दिवसांचे धरणे आंदोलन सुरू होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
आजपासून ५ जूनपर्यंत पुणतांब्यातील शेतकरी गावात धरणे आंदोलन करणार आहेत. यामध्ये आंदोलनात राज्यभरातले शेतकरी सहभागी होणार आहेत. ५ जूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करु, असा इशारा पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
कृषी दिंडीने आंदोलनाला प्रारंभ
बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धभिषेक करून गावातून कृषी दिंडीने पुणतांबा धरणे आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती सरपंच धनंजय धनवटे यांनी दिली. पुणतांबा ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी मंच उभारला आहे. हे आंदोलन 1 ते 5 जून पर्यंत सुरू असणार आहे. राज्यातील अनेक शेतकरी नेत्यांशी आंदोलनाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सरपंच धनंजय धनवटे यांनी दिली.
या मागण्यांसाठी आंदोलन:
1) ऊसाला एकरी एक हजार रूपये अनुदान द्यावे
2) शिल्लक ऊसाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे
3) कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा
4) कांद्याला प्रती क्विंटल 500 रूपये अनुदान द्यावे
5) शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण आणि सुरळीतपणे वीज मिळावी
6) थकित विजबिल माफ झाले पाहिजे
7) कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी
8)सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा
9) 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी
10) नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे
11) दुधाला ऊसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा
12) दुधाला कमीतकमी चाळीस रूपये दर दिला जावा
13) खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी
14) वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी
15) शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे
16) वन हक्क कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनी त्यांच्या नावावर केल्या जाव्या