मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 2 जागा या विदर्भातील आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदार संघाचा यात समावेश आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात राज्यातील 2 पदवीधर आणि 3 शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. नाशिक आणि अमरावती हे पदवीधर तर नागपूर, कोकण आणि औरंगाबाद या शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. या निवडणुकीची अधिसूचना 5 जानेवारीला जारी होणार आहे. 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 16 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येईल. तर 30 जानेवारीला मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार रणजित पाटील यांची उमेदवारी याआधीच भाजपने जाहीर केली आहे. तर नागपूर शिक्षक मतदार संघासाठी अनेक इच्छुक उमेदवार असतानाही सलग तिसऱ्यांदा विद्यमान आमदार नागो गाणार यांची उमेदवारी भाजपतर्फे निश्चित मानली जात आहे.