शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे (shrikant Shinde) यांचे उल्हासनगरमधील कार्यालयावर आज संतप्त शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष पेटला आहे. त्यानंतर आज ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी गाडीच्या बोनेटवर उभे राहून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. यावेळी त्यांनी प्रामाणिक शिवसैनिकांची माथी भडकवण्याचं काम आता केलं जात आहे असं असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडानंतर आता शिंदे समर्थक आमदारांविरोधात शिवसैनिकांना आक्रमक झाले आहेत. राज्यात विविध ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहेत. शिंदे समर्थक आमदारांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. आज आक्रमक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरमधील कार्यालयावर दगडफेक केली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. याच दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यामध्ये शक्तीप्रदर्शन केले असून, यावेळी त्यांनी महाराष्ट्रभर लोकांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करा, आमदारांच्या घरावर जा असं सांगितलं जात आहे. दगडफेक करा असं सांगतात पण येतात चार लोक. माझ्याही कार्यालयावर लांबून दगड मारून पळाले. शिवसैनिक असाल तर समोर या असं आव्हान श्रीकांत शिंदे यांनी केलं. ५० लोकांची साथ एकनाथ शिंदेंना आहे. अनेकांना आपल्या मतदार संघात चांगलं काम होईल असं वाटत असल्याचंही ते म्हणाले.
आम्ही फक्त एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या शिकवणीवरून शांत आहोत. आम्हाला भडकावण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्र कोणत्याही धमक्या खपवून घेणार नाही. आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकनाथ शिंदेंसोबत आहेत कारण एकनाथ शिंदे कायम त्यांच्यासाठी प्रत्येक क्षणी असतात. एकनाथ शिंदेंच्या घराचे दरवाजे सर्वांसाठी कायम खुले असतात. एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी कायम उभे असतात, असंही ते म्हणाले.