मुंबई : गोरेगावातील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालायाने अटक केलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या कोठडीची मुदत आज संपत आहे. त्यामुळे ईडी त्यांना विशेष पीएलएमए न्यायालयासमोर हजर करणार आहे. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांच्याकडे अद्यापही चौकशी बाकी असल्याने ईडी त्यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
पत्रा चाळ पुनर्विकासात झालेला सुमारे १ हजार ४० कोटी रुपयांचा घोटाळा आणि पंजाब अँड महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्यान्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून ईडी तपास करत आहे. ईडीने ३१ जुलैच्या सकाळी संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यावर छापेमारी करत साडेनऊ तास शोधमोहीम राबविली. या कारवाईनंतर ईडीच्या पथकाने राऊत यांना ताब्यात घेऊन ईडीच्या बेलार्ड पिअर येथील कार्यालयात आणत चौकशीअंती रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी त्यांना अटक केली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांना १ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर राऊतांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी जामीन अर्जास दाखल केला आहे. यामुळे राऊतांची पुन्हा कोठडीत रवानगी होणार का जामीन मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राऊतांची कोठडीत चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे त्यांच्या संबंधित दोन ठिकाणी ईडीने धाडी मारल्या. ईडीने नेमक्या धाडी कुठे मारल्या याची माहिती मिळाली नाही. तर, वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली आहे.