शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. आज ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले. ईडी (ED) कार्यालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रा चाळ कुठेय हेच मला माहीत नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
ईडी चौकशीपूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "माझा केंद्रीय तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास आहे. माझा काहीच गुन्हा नसल्यामुळे मी अत्यंत बेडरपणे चौकशीला सामारं जातोय. चौकशीला सामोरं जाण्याची हिम्मत माझ्यामध्ये आहे. मला असं वाटतं, या देशाचा नागरिक म्हणून, राज्यसभेचा खासदार म्हणून कोणत्याही तपास यंत्रणेच्या चौकशीला निर्भयपणे सामोरं जाणं आणि आपली बाजू मांडणं हे माझं कर्तव्य आहे. मी पळपुटा नाही, ईडीवर माझा विश्वास आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "मला पत्राचाळ कुठे आहे हेच माहीत नाही. एक मंत्री होते पत्रावाला, तेच माहीत आहेत. तरिदेखील देशातील केंद्रीय तपास यंत्रणेनं मला समन्स पाठवलंय, त्यांना थोडी माहिती हवीये, त्यामुळे मी त्यांना सहकार्य करणार.
काय आहे पत्राचाळ घोटाळा?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.