राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब तब्बल 8 तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडले आहेत. यावेळी परब यांनी आपण ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिल्याचे सांगितले. त्याचसोबत यापुढेही ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अनिल परब सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली. या चौकशीनंतर अनिल परब म्हणाले, 'आज मला जे समन्स आलं होतं त्या अनुषंगाने ईडीच्या कार्यालयात आलो.अधिकाऱ्यांनी जे प्रश्न मला विचारले त्या सगळ्यांची उत्तरं देता आली. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी त्यांना दिली आहेत.
ईडी ही एक अथॉरिटी आहे. त्यामुळे त्यांना उत्तरं देणं ही माझी जबाबदारी आहे. कुणा वैयक्तिक व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही. यापुढेली मी ईडीला सहकार्य करणार. ईडीच्या अधिकाऱ्याचं समाधान झालं की नाही याबाबत मी सांगू शकत नाही. मात्र, मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी त्यांना दिली आहेत', असं अनिल परब म्हणाले.