मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना आज अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस बजावली आहे. भोसरी एमआयडीसी जमिन कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ही नोटीस बजावली आहे. याप्रकरणी एकनाथ खडसेंच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली होती. आता या मालमत्ता निष्कासित करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे..
एकनाथ खडसे आणि इतर ४ जणांना पीएमएलए कायद्याअंतर्गत नोटीस बजाविण्यात आली आहे. यामध्ये खडसे यांची पत्नी मंदाकिनी, गिरीश चौधरी, इन्सिया मुर्तजा बदलावाला आणि फक्ररद्दीन उकानी यांचा समावेश आहे. मंदाकिनी, गिरीश चौधरी यांच्या नावावरील मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ती आता निष्कासित करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये लोणावळामधील एक बंगला आणि जळगावमधील 3 फ्लॅट असे एकूण 5 कोटी 73 लाख रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे 31 कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.75 कोटी रुपयांमध्ये विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता.