अनिल ठाकरे | चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्गूस गावात निवासी घर अचानक जमिनीत गडप झाले आहे. 70 फूट जमिनीत संपूर्ण घरच गडप झाल्याने परिसरात खळबळ एकच उडाली आहे. याप्रकरणी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अतर्ट झाली असून परिसर खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणताही जीवितहानी झालेली नाही.
गावातल्या आमराई वार्डात आजूबाजूला कोळसा खाणी व वर्धा नदीचे विशाल पात्र आहे. याच भौगोलिक परिस्थितीमुळे भूमिगत कोळसा खाणीतील पोकळी व महापुराचे पाणी झिरपल्याने अशा पद्धतीने घर गडप झाल्याची घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. सध्या या भागातील पन्नासहून अधिक घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असून वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड प्रशासन, पोलीस व स्थानिक यंत्रणा कामाला लागले आहेत. भूगर्भ अभ्यासक व कोळसा खाणीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून प्रत्यक्ष स्थितीचा अभ्यास करणार आहेत.
या घटनेची माहिती समजताच आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहे. जोरगेवार यांनी सदर नागरिकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाला केल्या आहेत. परिसर खाली झाल्यावर येथे चोरी सारख्या घटना घडू शकतात. त्यामुळे येथे पोलीस उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. सदर परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्याच्या सुचनाही त्यांनी महावितरण विभागाला केल्या आहे.