भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आज दादरमधील चैत्यभूमीवर अनुयायांनी पहायला मिळत आहे. असे असतानाच भीम आर्मीनं आज दादर स्थानक परिसरामध्ये आंदोलन केलं. दादर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करत आंदोलकांनी दादर स्थानकावरील ब्रीजवर घोषणाबाजी केली.
पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर, प्रभादेवी या स्टेशनची नावं बदलण्यात आली. मग दादरला डॉ. बाबासाहेब आंबेडर यांचं नाव का दिलं जात नाही, असा प्रश्न भीम आर्मीने उपस्थित केला आहे. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आधी दादर स्थानकासमोर आंदोलन केलं. त्यानंतर 'जय भीम, जय भीम', ' नामांतरण झालंच पाहिजे झालंच पाहिजे', 'होतं कसं नाय झालंच पाहिजे' अशा घोषणा देत भीम आर्मीचे कार्यकर्ते दादर स्थानकामध्ये शिरले. सुरुवातीला पोलिसांनी त्यांना विरोध केला. मात्र परिस्थिती चिघळू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवत आंदोलकांना दादरस्थानकावरील ब्रिजवरुन घोषणाबाजी करत चालत जाण्यासाठी परवानगी दिली. आंदोलकांनी पोलीस बंदोबस्तामध्येच हातात नामांतरणाच्या मागणीचे पोस्टर्स पकडून घोषणाबाजी करत नामांकरण तातडीने करण्यासंदर्भातील पावले उचलावीत अशी मागणी केली.