पुणे : राज्यात कोरोना विषाणूने (Corona Virus) पुन्हा एकदा डोके वर काढले असून BA4 आणि BA5 या दोन व्हेरिएंटचा आता शिरकाव केला आहे. या नव्या व्हेरिएंटचे सर्वप्रथम पुण्यात सात रुग्ण आढळले. धक्कादायक म्हणजे यामध्ये 9 वर्षीय मुलाचा समावेश होता. दरम्यान, त्या सातही रुग्णांना डिस्चार्ज दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले आहे.
पुण्यात BA.4, BA.5 व्हेरिअंटचे रुग्ण आढळले असून एकूण सात जणांना या नव्या व्हेरिएंटची लागण झाली होती. या रुग्णांमध्ये 4 पुरुष व 3 महिलांचा समावेश असून एका 9 वर्षीय मुलाचा देखील समावेश असल्याचे माहिती राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली होती.
तर यातील काही रुग्ण हे दक्षिण अफ्रिका आणि दक्षिण भारतातून आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच, त्या सातही रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याने ते पूर्णपणे बरे झाले असून डिस्चार्ज दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सर्व जिल्ह्यांना त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं, घाबरण्याचं आत्ता काही कारण नाही, पण काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवा व्हेरिएंट आला आहे तो नेमका नवा व्हेटिअंट आहे की अफवा आहे हे पाहावं लागेल. त्याबद्दल आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी करायला सांगितली आहे. सोमवारी त्याबद्दल इतंभूत माहिती घेतली जाईल. जर ती गंभीर बाब असेल तर जनतेला माहिती दिली जाईल, अशी माहिती सांगितली.