मुंबई : राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण 2022चा पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. माणसाची खरी श्रीमंती ही संस्कारात असते. आप्पासाहेबांनी निरुपणाच्या माध्यमातून सकारात्नकता दिली. श्री सेवक हे जगातलं आठवं आश्चर्य असून आप्पासाहेब धर्माधिकारींचं कार्य खरोखर महान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
जगात सात आश्चर्य आहे असे म्हणतात. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमाला येतो तेव्हा आठ आश्चर्य दिसतात. तुम्ही श्री सदस्य हे आठवे आश्चर्य आहात. माणसाची खरी श्रीमंती पैशांची नाही तर संस्कारांची असते. विचारांची श्रीमंती घेऊन तुम्ही जगता व तुमच्याहून अधिक श्रीमंत कुणी असूच शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
कपडे खराब झाले तर धुता येतात. शरीर आंघोळीने स्वच्छ करता येते. पण, मन कसे स्वच्छ करणार? मन स्वच्छ करायचे रसायन आणि कला खऱ्या अर्थाने आप्पासाहेबांच्या वाणीत आहे. आप्पासाहेब हे महाराष्ट्र भूषण आहेत. सरकारने केवळ कृतज्ञता व्यक्त केली. सरकार म्हणून धन्यवाद मानू इच्छितो. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीमध्ये आप्पासाहेब यांना पुरस्कार दिला जातोय हा एक विलक्षण योगायोग आहे.
इतिहासाचे अवलोकन करताना आपल्या घराचा इतिहास ४०० वर्षांचा आहे. धर्मजागृतीचे काम आपले वंशज करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी सांगितले की आपण शांडिल्य नाही आहात तर धर्माधिकारी आहात. तिथपासून पिढ्यानपिढ्या धर्म जागरणाचे काम सुरु आहे, असेही फडणवीस म्हणाले.