सचिन वाझे, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि यानंतर पोलीस महासंचालक परमबीरसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्याचे चित्र आहे. आयपीएस परमबीरसिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यानंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. हे सर्व प्रकरण धक्कादायक असून गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
या सर्व प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सुबोध जैस्वाल यांच्या अहवालातील संदर्भ दिले आहेत. तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी पोलिसांच्या बदल्यांचे रॅकेट , पैंशांचे व्यवहार तसेच पदांसंदर्भात सुरू असणाऱ्या दलालीबाबत एक रिपोर्ट सादर केला होता. या रिपोर्टची साधी चौकशीही करण्यात आली नाही, असे फडणवीस म्हणाले. सध्या बदल्यांच्या रॅकेटमधून सतत गृहमंत्र्यांचे नाव समोर येत आहे. यामध्ये अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. जोपर्यंत राजीनामा देत नाही, तोपर्यंत भाजपाचे आंदोलन सुरू राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर त्यांनी आश्चर्य व्यक्त करत पवार आपलं सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांनी म्हटलं. पवार यांनी माध्यमांना सांगितलेलं अर्धसत्य आहे. वाझे यांना परमबीरसिंह यांनी १६ वर्षांनंतर पुन्हा सेवेत घेतलं. मात्र, यामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा हात आहे, असे फडणवीस म्हणाले.
मनसुख हिरेन आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या प्रकरणात वाझे यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीत काही कारचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील अनेक महागड्या गाड्या एनआयएने ताब्यात देखील घेतल्या आहेत. मात्र, 'त्या' गाड्या ६ महिन्यांत कोण वापरत होतं ? याची चौकशी व्हावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. कोणते मोठे लोक या गाड्या चालवत होते ? याची चौकशी व्हावी, अशी मागणी फडणवीसांनी केली.