मेळघाटातील वनरक्षक दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला. तसेच या प्रकरणात अमरावती येथून बदली करण्यात आलेले अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. भाजपने या प्रकरणात आक्रमक पावित्रा घेत अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आरएफओ दीपाली चव्हाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांनी सुसाई़ड नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना उद्देशुन लिहली होती. त्यामुळं श्रीनिवास रेड्डी यांचंही निलंबन करावं अशी मागणी होत होती. भाजपनंही रेड्डींच्या निलंबनांची मागणी उचलून धरली होती.आज अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात भाजपने ठिय्या आंदोलन केले. रेड्डी यांच्या निलंबन व अटकेची मागणी करण्यात आली.
अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रेड्डीच्या अटकेसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आज दुपारी श्रीनिवास रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले.