मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे. मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनी मोठी घोषणा केली आहे.
3 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.
याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिपक केसरकर म्हणाले की, माझ्या आयुष्यातला हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. कारण मराठी भाषेचा मंत्री असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याच्यासारखी दुसरी आनंदाची बाब असू शकत नाही. हे प्रयत्न आज सुरु झाले नाहीत. 2012 सालामध्ये रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली होती आणि अनेक पुरावे कारण हे एवढे सोपे नसतं अभिजात भाषेचा दर्जा मिळवणं.
पंधराशे ते दोन हजार वर्षापेक्षा अधिक प्राचीनता असायला लागते. साहित्यामध्ये ते साहित्य अभिजात असायला लागते. ते दुसऱ्या भाषेपासून घेतलेलं असता कामा नये. खूप प्रयत्न झाले, विधानसभेनं ठराव केलं. परंतु खऱ्या अर्थाने मी ज्या ज्या वेळा आदरणीय पंतप्रधान महोदयांना भेटलो, अमित शाहांना भेटलो त्यावेळेला आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघांनी एवढा सपोर्ट केला की यावर्षाचीसुद्धा महाराष्ट्राची जी महत्वाची काम होती की ज्यांना महत्व देऊन पंतप्रधान महोदयांकडे पाठवलं होते. त्याच्यामध्येसुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याबद्दलचा उल्लेख होता. मी मुंबईचा पालकमंत्री आहे शेवटी मराठीचा अभिमान आहे. आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच असते की मराठीची मान ताठ उभी राहिली पाहिजे, भारतामध्ये आणि ते घडलं. असे दिपक केसरकर म्हणाले.